खेड तालुक्यात लॉक डाउन च्या पहिल्या दिवशी चाळीस नवे रुग्ण एकाचा मृत्यू तर राजगुरुनगर परिसरातील एक अग्रगण्य बँक ठरलीय हॉटस्पॉट एकाच दिवसात १० पॉझिटिव्ह....
राजगुरूनगर : खेड तालुक्यात प्रांत अधिकारी यांनी विविध निर्बन्ध लादत केलेल्या उपाययोजना सपशेल फेल ठरत असून रुग्णांचा आकडा डबल सेंच्युरी पार करत २३४ वर जाऊन पोहचला आहे. लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करत खेड तालुका कडक बंद करावा यासाठी पाठपुरावा केला होता. परंतु हा कसला लॉकडाऊन ?? लोकप्रतिनिधींनी केलेल्या कडक लॉकडाउनच्या मागणीवर प्रशासनाने निर्बंधांचा पोचारा फिरवून हात झटकले आहेत. खेड तालुक्यांमध्ये कोविड १९ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने याबाबत कठोर उपाययोजना करण्याची मागणी लोकप्रतिनिधिंनी केली होती. याबाबत खेड तालुका रविवार पासून कडक बंद असा पोस्ट देखील सोशल मीडियावर फिरल्या. या पोस्टमध्ये खेड तालुका रविवारपासून १२ तारखेपर्यंत कडेकोट बंद होणार असल्याचे भासवण्यात आले त्यामुळे शनिवारी व रविवारी दिवसभर राजगुरुनगर शहरात नागरिकांनी खरेदीसाठी तोबा गर्दी केली होती.
लोकप्रतिनिधींच्या आवाहनाला प्रतिसाद देत मा. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार सुचित्रा आमले यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत लॉकडाउनच्या पुढील रूपरेषा बाबत चर्चा करण्यात आली. परंतु कुठलाही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. लोकप्रतिनिधींनी केलेल्या कडक लॉकडाऊन च्या मागणीवर पोचारा फिरवण्यासाठी काही निर्बंध मात्र घालण्यात आले.
त्यानुसार १) अत्यावश्यक सेवा बंद राहणार नाहीत.
२) औद्योगिक आस्थापना, शासकीय कार्यालये, दवाखाने, बँका, पतसंस्था सुरूच राहतील.
३) कंटेन्मेंट झोन वगळता उर्वरित भागातील सर्व कामगार/कर्मचारी यांना कामावर जाण्यास परवानगी असेल.
४) किराणा, दूध, भाजीपाला सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत सुरू राहील.
वरील अटींच्या अधीन राहून निर्बन्ध लावण्यात येणार असून या आधारे उपाययोजना करण्यात येतील असे वाटले होते. परंतु तसे झाले मात्र नाही.
राज्य सरकार मध्ये देखील लॉकडाऊन करण्याबाबत मतभेद आहेत. तीन पक्षांचे सरकार असलेली महाआघाडी याबाबत काय निर्णय घेणार हे पुढील काळात कळेलच.
मात्र जनसामान्यांतून कडक लॉकडाऊन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या व मृत्यूचा आकडा पाहता आता जीवन हेच सर्वोच्च मानून जर स्वयंशिस्तीने बंद पाळला तरच हा बंद यशस्वी होऊ शकतो. परंतु औद्योगिक आस्थापना व शासकीय कार्यालये सुरू असल्यास त्यासाठी तालुक्यात येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. जोपर्यंत प्रशासकीय स्तरावरून या बंद बाबत काही ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत हा बंद यशस्वी होणे अशक्यप्रायच मानले जात आहे.
त्यात शासन स्तरावर एकोप्याने काम होत नसून राजगुरूनगर, आळंदी नगरपरिषद भाजपा कडे, तर चाकण नगरपरिषद आणि पंचायत समिती शिवसेनेकडे आणि आमदार, जि. प. अध्यक्ष हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असल्याने कुणाचाच कुणाला ताळमेळ नसल्याचे चित्र सध्या खेड तालुक्यात दिसत आहे. प्रशासनावर कुठल्याही राजकीय पक्षाची म्हणावी अशी पकड या आपत्तीत पाहायला मिळाली नाही. प्रत्येक वेळी बंद च्या निर्णयात राजकारण झाले आणि सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्यात आले.

आज नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या ४० रुग्नांच्या जवळच्या संपर्कात ३०० जण आहेत. त्यांच्या तपासण्या व रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे.
या व्यतिरिक्त म्हाळुंगे येथील स्टार कंपनीत ११ जण पॉझिटिव्ह आल्याने २८० जणांना कोरोंटाईन करण्यात आलेले आहे. राजगुरूनगर परिसरातील अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या स्थानिक बँकेत ८ कर्मचारी व संबंधित २ व्यक्ती असे १० एकूण पॉझिटिव्ह आल्याने ही बँक कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. बँकेचा १ आजी व १ माजी संचालक देखील वेगवेगळ्या संपर्कातून पॉझिटिव्ह आल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे.
संपूर्ण राजगुरूनगर शहर कंटेन्मेंट झोन जाहीर करावे अशी मागणी पं.स.सभापती अंकुश राक्षे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. कोरोना आपत्तीत सेवकार्यात अग्रेसर असलेला खेड तालुका या लढाईत मात्र राजकीय चक्रव्यूहाचा बळी ठरतोय का ? अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. आता ही लढाई सर्वसामान्य जनतेने हाती घेतली आणि लोकांनी स्वतः हुन नियम पाळायचे ठरवले तरच यावर नियंत्रण शक्य आहे अन्यथा कोरोना कधी कुठे केंव्हा कोणाचा घात करील हे सांगणे आता मुश्किल झाले आहे.