*पिंपरी-चिंचवड येथे वाहनचोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या ताब्यात*
पिंपरी-चिंचवड:
पिंपरी-चिंचवड मधील वाढत्या वाहन चोरीच्या घटनांमुळे नागरिक भयभीत होते तर पोलीस प्रशासन त्रस्त होते. मागील काही दिवसात दुचाकी तसेच चार चाकीच्या चोरीच्या घटना घडल्याने मा. पोलीस आयुक्त श्री. संदीप बिष्णोई यांनी गुन्हे शाखेला विशेष मोहीम राबवून ह्या घटनांना रोखण्याबाबत आदेश दिले होते.
गुन्हे शाखा युनिट 2 यांना त्या अनुषंगाने निगडी परिसरात चोरटे चोरीच्या वाहनासहित फिरत असल्याचे माहिती समजली असता, पोलिसांनी सापळा लावून भक्ती शक्ती चौकात चोरीच्या दुचाकी वाहनासाहित आकाश उर्फ पप्या राजेंद्र सांडभोर, वय:25 आणि सुजित उर्फ सुज्या भिवा गायकवाड, वय:27 पकडले. त्यांनी सखोल चौकशी केल्यावर चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांनी पुण्यातील विविध भागातून 5 चारचाकी व 2 दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
तसेच गुन्हे शाखा युनिट 5 यांना दोन इसम कृष्णा व्हेज हॉटेलपासूनच्या किवळे गावाकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावरून चोरीच्या दुचाकी वाहनावरून जाणार असल्याची पक्की खबर मिळाल्याने त्यानुसार सापळा लावण्यात आला. परंतु आरोपी तिथे आल्यावर त्यांना पोलिसांचा सुगावा लागल्याने त्यांनी गाडी तिथेच टाकून पळ काढण्याचा प्रयत्न केला,र परंतु पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यांना पकडले. पकडलेल्या इसमाचे नाव अक्षय दशरथ शिंदे, वय:20 तर दुसरा विधीसंघर्षग्रस्त बालक आहे. सुरुवातीला यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने युनिट 5 कार्यालय येथे त्यांना चौकशीला आणले. चौकशीत अक्षय दशरथ शिंदे यांनी मौजमजा करण्यासाठी वाहनचोरी केल्याचे कबूल करत, ती लपवून ठेवलेली जागेची माहिती दिली. यात 7 चोरीची दुचाकी वाहने जप्त करण्यात आली.
अशा प्रकारे गुन्हे शाखा युनिट 2 व युनिट 5 यांच्या एकूण कारवाईत 5 चारचाकी वाहनांचे व 9 दुचाकी वाहनांचे असे एकूण 14 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.