ब्रेकिंग न्यूज

" नंदू " नंदू म्हणजे सदानंद मार्तंड खाडे.

23/04/2021 03:38:42  352   लेखक सतीश दीक्षित

" नंदू " नंदू म्हणजे सदानंद मार्तंड खाडे. शिवाजी महाराज नुसते नाव उच्चारले तरी "तुर्यावस्थेत "जाणारे अनेक लोक महाराष्ट्रात आहेत असे पु.लं. नि लिहिलेले कोठेतरी वाचले होते, आमचे नंदू खाडे हे पण त्यातलेच! शिवजयंती , शिवपुण्यतिथी हे त्याचे दसरा नि दिवाळी, त्या दोन दिवशी तो 'काया-वाचा-मने ' पूर्ण शिवमय होऊन जात असे. नंदूचे घराणे तसे मूळचे जेजुरी चे, त्याचे वडील पोलीस खात्यात नोकरी करत असत.खेड हे त्याचे आजोळ..नंदू ची आई ही खेड च्या कुलकर्णी घराण्यातील.. अगदी पूर्वी त्यांचं कुटुंब माळावर च्या वाड्यात भाड्याने रहात असततेथे रहात असताना नंदू च्या वडिलांनी एक संपूर्ण वर्षाचे कॅलेंडर तयार केले होते, तारीख वार पुढे मागे करण्यासाठी लांब टोक न केलेल्या शिसपेन्सिली वापरून त्या हाताने फिरवून त्या त्या दिवशीचे तिथी , वार, नक्षत्र असे दाखवणारे एक सुंदर मुव्हिंग कॅलेंडर तयार केले होते, ते लहानपणी पाहिल्याचे आठवते. कारागिरी, चित्रकला, रांगोळ्या हे बहुतेक त्यांच्या कुटुंबाचे वंशपरंपरा वैशिष्ट्य असावे असे वाटते. अलीकडे काही वर्षांपूर्वी नंदू ने काढलेले एक चित्र मला चांगले आठवते त्या मध्ये घोड्यावर बसलेले खंडेराय व बाणाई आणि त्यांना आडवणारे राक्षस मणी- मल्ल व खंडोबाने त्यांचा केलेला वध . हे अगदी जिवंत चित्र पाहिल्याचे आठवते.नंदू Telco त नोकरीला होता, आम्ही कॉलेज ला असताना महात्मा गांधी विद्यालयात खेड-आंबेगाव-जुन्नर असे संयुक्त हिवाळी शिबीर झाले होते, नंदू त्यात पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून हौसेने काम करीत होता, शिबीर संपल्यावर हरिशचंद्र गड ला सायकलवर जाण्याची टूम निघाली होती,माळावर चा रविकाका ट्रिप चा सूत्रधार.... रजा मिळत नसल्याने नंदू ला येणे शक्य नव्हते पण त्याने त्याच्या ओतूर च्या सासुरवाडीस (महाराव) आम्ही अगदी नि:संकोच पणे जावे असे आम्हाला सांगितले ,त्या प्रमाणे काही न कळवता आम्ही आठ दहा जण तेथे जाऊन थडकलो व जावयाचे गावचे लोक म्हणून आमची तेथे अगदी व्यवस्थित ठेप ठेवण्यात आली होती. रायगडला शिवपुण्यतिथीला नंदू बरोबर जाण्याचा आम्हा मित्रांना बऱ्याचदा योग आला होता , आदल्या दिवशी जाऊन मुक्काम, दुसऱ्या दिवशीचा संपूर्ण कार्यक्रम पार पाडून निघताना महाराजांच्या समाधी पाशी गेल्यावर मात्र नंदू चा बांध सुटत असे ,महाराजsss म्हणून त्याने कळवळून फोडलेला हंबरडा पाहून आमच्या सर्वांच्या डोळ्यात पण चार दोन अश्रू आल्याशिवाय रहात नसत.पण अशा वेळेस मात्र कोणी त्याची थट्टा करण्याचा उद्योग केला तर मात्र तो भयंकर चिडत असे, मग तो कोणाचाच नसे.. थट्टा करणाऱ्याच्या सात पिढ्यांचा उद्धार होत असे. आपल्याला जे आवडते ते अगदी बिनधास्त पणे करणे.. तेथे कोणतीही भीड मुर्वत न ठेवणे हे त्याच्या स्वभावाचे एक वैशिष्ट्य! शिवजयंती, शिवपुण्यतिथी ची मिरवणूक , शिव पुतळा बसवण्याचा कार्यक्रम , अशा सर्व शिवमय ठिकाणी बेंबीच्या देठा पासून "प्रौढ प्रताप पुरंदर -सिंहासनाधिश्वर "अशी गर्जना ऐकू आली की नंदूच्या तेथल्या अस्तित्वाची जाणीव सर्वाना होत असे.बाबासाहेब पुरंदरे हे नंदू चे दुसरे दैवत! नंदू त्यांना प्रेमाने "बासाहेब " असे म्हणत असे.त्यांच्या जाणता राजा या नाटकात तर तो सहकुटुंब सह परिवार भाग घेत असे. नंदू च्या मुलीच्या लग्नाला बाबा साहेब खेडला आले होते व त्यांनी आशीर्वचनपूर्वक छोटे पण सूंदर भाषण केले होते , त्या वेळची नंदूच्या डोळ्यात दिसलेली कृतकृत्यता मला अजून चांगली आठवते !! मध्यंतरी तो आणि जाणता राजा मधले त्याचे सहकारी कोल्हापूर जवळच्या 'नेसरी'च्या खिंडी तील प्रतापराव गुजरांचे स्मारक पाहून आले होते त्या सहलीचे वर्णन तो भेटला की कायम करीत असे., 'अरे चला एकदा परत गाड्यांवर जाऊ कोठेतरी...' हे त्याचे भेटला की कायमचे वाक्य! कायम उत्साह .. भेटला की जगदंब...जगदंब म्हणत असे, त्यांनी मागच्या लॉक डाऊन काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व बजरंग दलाने सुरू केलेल्या सीता रसोई मध्ये देखील प्रचंड काम केले. त्यांचे वय जरी अधिक झाले असले तरी सामाजिक कामाप्रति असलेली निष्ठा मात्र कमी झाली नव्हती.नंदूच्या जाण्याने शिवबांचा एक मनस्वी शिलेदार कायमचा गेल्याची खंत मात्र कायम राहील....! 'सदानंद खाडे ' नामक महाराजांच्या मनस्वी शिलेदारास भावपुर्ण श्रद्धांजली.