ब्रेकिंग न्यूज

भाजपाचे 25हून अधिक नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी रांगेत उभे

21/02/2022 18:29:52  99136   सचिन देशमुख

पिंपरी - गेल्या पाच वर्षांत भाजपने केलेल्या प्रचंड भ्रष्टाचारामुळे अनेक नगरसेवक नाराज झाले आहेत. रोज एकजण राजीनामा देत असून राष्ट्रवादीमध्ये येण्यास अनेकजण इच्छुक आहेत.

राष्ट्रवादीतून एकही नगरसेवक बाहेर पडणार नसून भाजपाचे 25 हून अधिक नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी रांगेत उभे आहेत. त्यामुळे भाजपाच्या नेत्यांनी आता पक्षात भरती होईल हे विसरून जावे आणि आपल्या पक्षातून होत असलेली गळती रोखावी, असा टोला राष्ट्रवादीचे माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी भाजपाचे पक्षनेते नामदेव ढाके यांना लगावला आहे.

भाजपाचे नगरसेवक वसंत बोराटे यांनी नुकताच भाजपा सदस्यत्वाचा व नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता.

वसंत बोराटे सारखे दिग्गज नगरसेवक राष्ट्रवादीत गेले हे मात्र भाजपला खूप लागले, कारण भारतीय जनता पार्टीच्या मोशी भागातील जागा वसंत बोराटे यांच्यामुळे राष्ट्रवादीच्या निवडून येणार आहेत हे कुठल्या ज्योतिषाला सांगायची गरज नाही वसंत बोराडे यांचा थेट मतदारांशी वैयक्तिक संबंध सोसायटी धारकांची असलेले संबंध बीड उस्मानाबाद परभणी लातूर मराठवाडा विदर्भ या भागातून आलेली मंडळी ही त्यांच्या पाठीमागे सतत उभा असते मात्र ते भारतीय जनता पार्टीला कळले पण वळले नाही.

त्यावर प्रतिक्रिया देताना भाजपाचे महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी राष्ट्रवादीचे दहा नगरसेवक आमच्या संपर्कात असून ते लवकरच प्रवेश करणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर योगेश बहल यांनी आज पलटवार करत ढाके यांना टोला लगावला आहे.

याबाबत योगेश बहल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भाजपाने गेल्या पाच वर्षांत आपल्या सत्ताकाळात अनेक गैरप्रकार केले. करोनासारख्या महामारीचा फायदा उठवत 'मृतांच्या टाळूवरील लोणी' ओरबडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या पक्षाची खरी प्रतिमा जनतेसमोर आली आहे. यांचे कर्तृत्त्व शहरातील जनेतेने पाहिले आहे. लाचखोरी, खंडणी, जमिनी बळकाविणे, भ्रष्टाचार करणे असे एक ना अनेक प्रकार आपल्या सत्तेच्या काळात भाजपाच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी केल्यामुळे महापालिकेचीही पुरती बदनामी झाली.

भाजपाचे 25 हून अधिक नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये येण्यास इच्छुक आहेत. वसंत बोराटे यांच्यानंतर आज चंदा लोखंडे यांनी राजीनामा दिला आहे. पुढील आठ ते दहा दिवसांत अनेकजण भाजपा सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या निवडणुकीत विकासकामांच्या जोरावर पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता महापालिकेत येईल. त्यामुळे महापालिकेमध्ये यापुढे भाजपाची सत्ता येणार नाही हे सर्वांनाच माहीत झाले आहे. भाजपामध्ये जाऊन कोणीही राजकीय आत्महत्या करणार नाही. मात्र 'खोट बोल पण रेटून बोल' या प्रवृत्तीतून नामदेव ढाके हे जनतेमध्ये गैरसमज पसरवित आहेत. त्यांच्या अशा खोटारड्या वक्तव्याला आता शहरातील जनता बळी पडणार नाही. त्यामुळे ढाके यांनी पहिल्यांदा आपल्या पक्षातील गळती रोखावी आणि त्यानंतरच भरतीची दिवास्वप्ने पहावीत, असा टोलाही बहल यांनी लगाविला आहे.